पिंपरी (Pclive7.com):- देशाविषयीचे प्रेम आमच्या रक्तात आहे. त्यासाठी त्यागाची भूमिका कायमच आमची आहे. सध्या केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान हाती घेतले आहे. त्याचे स्वागतच आहे. मात्र त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच हर घर महागाई वाढली आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे. महागाईला कारणीभूत असल्याची देखील जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, असे आवाहनही सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, सध्या केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान राबविले आहे. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हा उपक्रम स्वागतार्हच आहे. प्रत्येकाला देशाभिमान असायलाच हवा. देशासाठी शूर वीरांसारखे प्राण देखील पणाला लावले पाहिजेत. या मताचे सगळेच आहोत. मात्र या अभियानाबरोबरच देशातील जनता देखील सुख, समाधानाने कशी राहील याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे आज देशातील जनता अस्वस्थ दिसत आहे. कामगार धोरणात बदल केल्यामुळे पिंपरी चिंचवडसह राज्य व देशभरातील कामगार रस्त्यावर आले आहेत. ते वारंवार आंदोलन करुन संताप व्यक्त करत आहेत. सरकारी नोकरीचे खाजगीकरण झाल्याने अनेकांना नोकरीची सुरक्षितता नाही. हे असताना आता महागाईने तर उच्चांक गाठला आहे.
पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीपार गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने गोरगरिबांना जगणे मुश्कील झाले आहे. पोटात अन्न नाही आणि हाताला काम नाही, अशी अवस्था देशवासीयांची आहे. त्यामुळे सध्या हर घर नोकरी, शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा, महागाई कमी करणे गरजेचे आहे. तरच देश अधिक समृद्ध होईल. अन्यथा देश वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी जनताच रस्त्यावर येईल, असा इशारा काळे यांनी दिला.





















Join Our Whatsapp Group