मुंबई (Pclive7.com):- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले.

गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले.
याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यासोबतच होल्डिंग बॅक (२०१५), मेनका उर्वशी (२०१९), थँक यू विठ्ठला (२००७), 1234 (२०१६) आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






















Join Our Whatsapp Group