पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात आज डझनभर वेब साईट सुरू झाल्या असताना त्यात आणखी एका वेबसाईटची भर असे आपल्याला वाटणे साहजिक आहे. पण आम्ही फक्त वेबसाईट सुरू करत नाही तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पीसीलाईव्ह 7 च्या माध्यमातून एक चळवळ उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या दबावाला बळी न पडता केवळ शहरवासियांच्या हिताच्या बातम्या देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बातम्या ही शहराने कधी पाहिल्या नव्हत्या त्या स्वरूपात..! होय शहरातली छोट्यातली छोटी घडामोड आपण दृश्य अर्थात ‘व्हिडिओ’च्या स्वरूपात पाहू शकणार आहात. शहरातला सर्वसामान्य माणूस त्याची व्यथा घेऊन आमच्याकडे येऊ शकतो. अन्याय करणारा कोणीही असला तरी त्या सामन्याचा आवाज पीसीलाईव्ह 7 बनणार आहे.
शहरातल्या इतर वेबसाईट त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. पण आम्ही त्यापेक्षा वेगळ्या आणि दर्जेदार पद्धतीने शहराच्या विकासासाठी आवश्यक विषयांवर भर देत व्यावसायिकतेच्या पुढे जात शहरवासियांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत. आमची शहरातल्या कोणत्याही वेबसाईटशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्र, चॅनेलशी स्पर्धा नाही. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. वेबसाईट केवळ बातम्या देण्यासाठी नाही तर अन्यायाला वाचा फोडणारी आणि तितक्याच दर्जेदार पद्धतीने बातम्यांचे सादरीकरण करणारी ठरावी नव्हे ती ठरणारच असा आमचा प्रयत्न आहे.
बातमी मागची बातमी मग ती सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो वा इतर कोणत्याही क्षेत्रातील, ती इतरांपेक्षा वेगळी असणार हे मात्र नक्की. आज शहारातल्या अनेक भागात छोट्या छोट्या वाटणाऱ्या समस्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालाय. व्यावसायिक रेट्यामुळे म्हणा किंवा मर्यादांमुळे म्हणा कोणी त्याकडे लक्ष देत नाही. पण आम्ही शहरातल्या एका जरी व्यक्तीची समस्या असेल तर ती ही मांडण्याचा प्रयत्न करू. केवळ बातम्या न देता त्या बातम्यांचा शहराच्या विकासासाठी फायदा व्हावा या प्रामाणिक हेतूने काम करणे हा आमचा उद्देश आहे. म्हणून शहरवासियांनो सज्ज व्हा बातम्यांच्या पटलावरचा ‘वजीर’ पीसीलाईव्ह7 येतोय आपल्या भेटीला…!