पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी बाकावर बसून नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी करणारे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज झाल्याचे दिसते. विरोधी पक्षात असूनसुद्धा समस्यांवर पक्षाची भूमिका प्रभावहीन झाल्यामुळे काम करण्यात रस नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात पक्षाला रामराम ठोकून नागरिकांच्या प्रश्नांवर आपण स्वतः आवाज उठविणार आहे, असे तापकीर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत मच्छिंद्र तापकीर विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली होती. पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, रस्त्यांची दुय्यम दर्जाची कामे होत असताना त्यांनी महापालिकेत अनोखी आंदोलने केली होती. त्यामुळे ते कायम चर्चेत राहायले. आंदोलनाच्या कल्पकतेमुळे ते नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यामुळे २०१२ च्या महापालिका निवडणुकीपुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अनिता तापकीर यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्या काळेवाडी प्रभागातून निवडूनही आल्या. पाच वर्षातील त्यांचे कामही तसे कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षातर्फे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील उमेदवार कैलास थोपटे आणि अनिता तापकीर यांच्यात एकवाक्यतेचा अभाव निर्माण झाला. त्यातच मोदी लाटेचा परिणाम झाल्याने राष्ट्रवादीचा पॅनेल पराभूत झाले. भाजपचे चारही उमेदवार प्रभागातून निवडून आले.