पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतधारकांनी अद्यापही मिळकतकर भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
महापालिका करसंकलन विभागाने शहरातील थकबाकीदार मिळकतधारकांनी मालमत्ताकर भरावा, याकरिता थकीत मालमत्तेवर आकारण्यात येणा-या दंडावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अभय योजना राबविली आहे. ही योजना १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर भरणा-यांचा ७५ टक्के दंड माफ तर १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत मालमत्ताकर भरणा-यांना ५० टक्के दंड माफ करण्यात येणार आहे. शहरात १ लाख २७ हजार मालमत्ता असून महापालिकेची १५ विभागीय करसंकलन कार्यालयांमार्फत कराची वसुली करण्यात येते. मालमत्ते करापोटी १२० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मुदतीत मालमत्ताकर न भरणा-यांना दरमहा दोन टक्के दराने दंड आकारण्यात येतो. चालू आर्थिक वर्षात पहिल्या व दुस-या सहामाहीची रक्कम भरणा न करणा-या मालमत्ताधारकांना १ ऑक्टोबर व १ जानेवारीपासून दरमहा दोन टक्के दराने दंड आकारला जातो.
महापालिकेच्या सर्व करसंकलन कार्यालयात मिळकतधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्याची सोय आहे. महापालिकेकडे ४ लाख ६५ हजार २१० मिळकतींची नोंद असून त्यापैकी २ लाख १५ हजार २३९ मिळकतधारकांनी २४७ कोटी ६३ लाख रुपये मिळकत कर भरणा केला आहे. त्यापैकी ९२ हजार २१० मिळकतधारकांनी ९८.३५ कोटी ऑनलाईन पेमेंट भरणा केला आहे. तरी नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेला सहकार्य करावे, असेही महापौर नितीन काळजे यांनी म्हटले आहे.