पिंपरी (प्रतिनिधी):- ‘सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळा’च्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची वर्णी लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यातील जालगांव येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, या सभेत सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी राज्यसभा अमर साबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष भटक्या-विमुक्त केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी खासदार साबळे यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंडणगड आणि दापोली तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी १९९२ साली या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तसेच आयएसओ मानांकन प्राप्त करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच संस्था आहे.
महाविद्यालयीन शिक्षणाची अडचण दूर व्हावी यासाठी संस्थेने लोकनेते गोपीनाथ मुंडे वरिष्ठ महाविद्यालयाची सुरवात केली. या महाविद्यालयाला नॅक या संस्थेकडून ‘बी’ श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नशाबंदी युवा मंचाच्या माध्यमातून खेडोपाड्यात जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण संचालनालयाने स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने भटक्या विमुक्त जमातीतील गरीब मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, व १ लाख रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहास दि.वि. गोखले स्मृती जागरण समितीतर्फे ‘सेवा पुरस्कार’ देण्यात आला आहे.
संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २०१५-१६ चा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार’ तसेच २०१६-१७ मध्ये १५ लाख रुपयांचा ‘शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.





















Join Our Whatsapp Group