पिंपरी (Pclive7.com):- महापालिका निवडणुका तोंडावर आहेत असं रोज म्हटलं जात आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारचं धाडस होत नाही. जनमत विरोधात आहे, म्हणून निवडणुकांना ते घाबरत आहेत. त्यामुळे निवडणुकीची सर्व प्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यसरकरवर जोरदार टीका केली.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, संजोग वाघेरे पाटील, शाम लांडे, विनोद नढे, राहुल भोसले आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष बांधणी करिता सभासद नोंदणीचे काम सध्या सुरू आहे. त्यातच आढावा घेण्यासाठी आज प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सदस्य नोंदणीचा आढावा घेतला, अनेक पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्टपणे सदस्य नोंदणी केली असून त्याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे. राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सध्या संभ्रमांची स्थिती आहे. निवडणुका तोंडावर आहेत असं म्हटले जातयं. मात्र सरकार निवडणुकांना घाबरत आहे, म्हणून महापालिका निवडणूका पुढे ढकलत असल्याचे ते म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पक्ष सोबत सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
शिवसेना आणि शिंदे गटासंदर्भात न्यायालयात उद्या निर्णय होणार आहे. देशात न्याय असेल, न्यायव्यवस्था जिवंत असेल तर उद्याच्या सुनावणीत आमचा विजय होईल. या निर्णयानंतर लोकांचा न्याय व्यस्थेवर विश्वास राहील. मात्र न्याय द्यायचाच नसेल तर निर्णय लांबणीवर टाकला जाईल असेही म्हणाले. जर न्यायालयाने आमदारांना निलंबित केले तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारला सीबीआय आणि न्यायालय या शिवाय काहीच सुचत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.






















Join Our Whatsapp Group