पिंपरी (Pclive7.com):- एका बाजूला शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नवी सांगवी परिसरातील अनेक भागांमध्ये आजही एका दिवसाआड केवळ दोन तास पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नवी सांगवीतील फेमस चौक येथे पाणीपुरवठा विभागाच्या पाइपलाइनच्या कामादरम्यान लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केला आहे. समतानगर, गणेशनगर, संत तुकारामनगर, समर्थनगर यांसह अनेक उपनगरांमध्ये नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत असताना दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

जोगदंड यांनी सांगितले की, फेमस चौक येथे सुरू असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याची माहिती त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपशहर अभियंता (पाणीपुरवठा विभाग) अजय सूर्यवंशी, ह प्रभाग पाणीपुरवठा अधिकारी संभाजी गायकवाड आणि कनिष्ठ अभियंता सोनाली खेमकर यांना दूरध्वनीद्वारे दिली आहे. संबंधित ठिकाणचा व्हिडिओही अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला असून, तरीही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“एकीकडे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्याच्या नासाडीला आणि नागरिकांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण?” असा सवाल जोगदंड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा ठेकेदाराकडून कोणतेही बॅरिकेडिंग अथवा सूचना फलक लावण्यात आलेले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय, फेमस चौक परिसरात पाणीपुरवठ्याच्या कामामुळे मंगळवारी संध्याकाळी सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, त्या ठिकाणी वाहतूक पोलिस किंवा ठेकेदाराचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव आणि कामाच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाणीटंचाई, पाण्याची नासाडी आणि वाहतूक कोंडी या तिहेरी समस्यांमुळे नवी सांगवीतील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




















Join Our Whatsapp Group