पिंपरी (Pclive7.com):- पवना धरण सध्या 99 टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

आज (दि.03) सकाळी 9 वाजेपर्यंत पवना नदीपात्रात 4,370 क्युसेक विसर्ग सुरू होता. तो वाढवून 5,720 क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प, पवनानगर येथील पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे. तसेच पावसाचे प्रमाण आणि धरणातील आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत 12,500 क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे ओढे, नाले आणि नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पवना नदी खोऱ्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.




















Join Our Whatsapp Group