पिंपरी (प्रतिनिधी):- आशिया खंडातील ‘श्रीमंत’ महापालिका म्हणून लौकिक मिळवलेले पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या ३५ वर्षात ‘गाव ते महानगर’ असा प्रवास आहे. उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आलेले हे शहर ‘आयटी हब’ म्हणून ओळखू लागले आहे. देश पातळीवरील ‘बेस्ट सिटी’च्या पुरस्काराने तर शहराच्या शिररेचात ‘मानाचा तुरा’ रोवला गेला आहे. आता या शहराने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा ३५ वा वर्धापनदिन आज ११ ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. चार ग्रामपंचायती एकत्रित करून स्थापन झालेली नगरपालिका व पुढे अल्पावधीत झालेली महापालिका अशी ‘गाव ते महानगराची’ ३५ वर्षांची वाटचाल पूर्ण झाली आहे. मुळातच काँग्रेसच्या विचारधारेने जन्म घेतलेल्या या शहराची सर्व सुत्रे आज भाजपच्या हाती आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेस आणि कालांतराने राष्ट्रवादीने इथे आधिराज्य गाजवले आहे. फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत परिवर्तन होऊन इथे भाजपने सत्ता हस्तांतरीत केली. पूर्वी ज्यावेगाने महापालिकेतील कारभार चालत होता त्याला आता ‘पारदर्शकतेमुळे खंड पडल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या काळात विकासाच्या नावाखाली होत असलेली कोट्यावधींची उधळपट्टी, टक्केवारीचे राजकारण याला ऊत आला होता. मात्र सत्तांतरानंतर काही वेगळे चित्र नाही. सध्या विकास गेला कुठे? असचं म्हणायची वेळ आली आहे. नियोजनाचा अभाव, टक्केवारीचे राजकारण असेच चालू राहिले तर शहराची श्रीमंती इतिहासजमा होणार असल्याची चिन्हे आहेत. महापालिकेला भविष्यात ‘भिकेचे डोहाळे’ लागतील, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तडफदार नेतृत्वामुळेच गेल्या १५ वर्षात या शहराचा दैदिप्यमान विकास झाला. विरोधक देखील जाहिरपणे याची कबूली देतात. शहराचा विकास साधताना राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. आज महापालिका आपला ३५ वा वर्धापन दिन साजरा करताना सामान्य नागरिकाला त्याचा मोठा अभिमान वाटत असला तरी भविष्याची चिंता देखील आहे. ज्या राष्ट्रवादीने या शहराचा कायापालट केला, सर्वांगिन विकास केला, तरी देखील त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. यावेळी शहरवासियांनी भाजपवर विश्वास ठेवला. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे या स्थानिक नेत्यांवर जनतेने विश्वास टाकला आहे. यांना शहराचा बारकाईने अभ्यास आहे. नेमके कशापध्दतीने काम केले पाहिजे हे या मंडळींना चांगलेच ठाऊक आहे. शहरातील जनतेला फक्त विकास हवायं… म्हणूनच आता या मंडळीनी देखील तो विश्वास सार्थ करून दाखवावा एवढीच अपेक्षा..






















Join Our Whatsapp Group