पिंपरी (Pclive7.com):- शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर कृष्णाजी काटे यांचा कबड्डी खेळातील विशेष योगदानाबद्दल पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने उद्या गुरूवार (दि.१६) रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक नवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश काटे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा निमंत्रित २०२२ कबड्डी स्पर्धेचे आयोजन पिंपळे सौदागर येथील स्व. पंढरीनाथ फेंगसे क्रीडानगरी, अण्णासाहेब मगर विद्यालय येथे करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा पार पडणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घटन प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर कृष्णाजी काटे यांचा कबड्डी खेळातील विशेष योगदानाबद्दल भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, आमदार अतुलदादा बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे, संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.