पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर आज (दि.२७) ईडीने छापा टाकला आहे. मुलचंदानी यांच्या पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत सध्या तपासणी सुरु असून इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीने छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. मुलचंदानी यांच्या घरात ईडीचे पथक ठाण मांडून आहे. पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत मुलचंदानी राहतात. याच ठिकाणी ईडी कसून तपासणी करत आहे. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत. कोणालाही या इमारतीत प्रवेश करू दिला जात नाही.
बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर करून जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना वितरित केले. कर्ज मिळण्याची पात्रता, परतफेडीची क्षमता व अन्य निकष न तपासताच पैशांचे वाटप करण्यात आल्याचे आरोप झाले होते. याप्रकरणी अमर मुलचंदानी यांच्यासह इतर संचालकांना अटक झाली होती. आता या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहेत.
बँकेने बनावट कागदपत्रे वापरून, त्याच्या आधारे कर्जवाटप चारशे कोटीपेंक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती.आता पुन्हा ईडीने छापा टाकल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.