पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडी वतीने आज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “बेडकाला वाटतं मीच फुगलो आहे, पण ते फुगले पण काही खरं नसतं.” असा टोला पवारांनी राहुल काटे यांना लगावला आहे.
महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करताच वरिष्ठ नेत्यांनी विनंती करूनही कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतला. तसेच अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले. त्यांच्या या बंडखोरीनंतर शिवसैनिकांनी महाविकास आघाडी सोबतच काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आज सभेमध्ये पवार यांनी कलाटेंना चांगलेच सुनावले आहे.
पवार म्हणाले, “ज्यांचा अर्ज राहिला आहे, तो राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे, सचिन अहिर आणि प्रत्येकजण प्रयत्न करत होतो. कोणीही अपक्ष राहू नका सरळ लढत होऊद्या. कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपात सरळ लढत आहे. ते सांगत होते की, एक लाखांच्यावर मतं पडली. पण, ती शिवसेना राष्ट्रवादीची मते होती,” असा टोमणा अजित पवारांनी कलाटेंना लगावला.
पुढे ते म्हणाले, “बेडकाला वाटतं मी फुगलो आहे. मात्र, ते फुगलेपण काही खरं नसते. यात बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे. कोणीतरी सांगितलं, अर्ज काढू नको. विरोधकांना वाटलं असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर आपणांस निवडणूक सोपी जाईल. परंतु, कृपा करून कोणी रूसु आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणायची आहे,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.