खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
मावळ (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील माथेरान नगरपरिषद क्षेत्रात 6 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 47 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
खासदार बारणे म्हणाले, माथेरान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत या 2019-20 पासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निधी मिळण्याकरिता माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. मानवाधिकार न्यायालयाने याबाबत सुमोटो पद्धतीने मे 2022 साली हस्तक्षेप केला. मा न्यायालयाने देखील महाराष्ट्र सरकारलानिधी उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या होत्या. 2019-20 साली जवळपास 33 कोटींचा हा प्रस्ताव काही तांत्रिक दुरुस्ती आणि बदल केला. राज्य सरकारच्या नवीन डीसीआर सूचीनुसार 21 जुलै 2022 रोजी या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कडून 47 कोटी 34 लाख 14 हजार 738 रुपयांची तांत्रिक मान्यता घेण्यात आली.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित होता. शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी 47 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या प्रकल्पामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे माथेरान मधील सांडपाण्याचा प्रश्न सुटेल. हा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मावळ लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली असल्याचे खासदार बारणे म्हणाले.