पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी व्यावसायिकांना पायघड्या घातल्या. त्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी अर्ज केले. त्यानंतरही महापालिकेने संबंधित होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात शहरामध्ये तब्बल ४३४ धोकादायक अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे समोर आले आहे.
किवळे येथे धोकादायक असलेले जाहिरात होर्डिंग अंगावर पडल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. असे असताना अनधिकृत जाहिरात होर्डिंग शहरामध्ये उभे कसे राहतात? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याला महापालिका प्रशासनाचा कारभार व उत्पन्न वाढवण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंगचे सर्वेक्षण केले. त्यानंतर अनधिकृत आढळलेल्या होर्डिंग मालकांना होर्डिंग अधिकृत करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२१ ला अर्ज करण्यास सांगितले. ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ४३४ मालकांनी होर्डिंग अधिकृत करण्यासाठी अर्ज केले. मात्र, त्यानंतर संबंधित होर्डिंग धोकादायक असल्याची उपरती महापालिका प्रशासनाला झाली. महापालिकेने संबंधित होर्डिंग अधिकृत न करता पाडण्याचा निर्णय घेतला.
या कारणामुळे कारवाई नाही..
याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या विरोधात व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचा दावा करत मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयामध्ये तब्बल ८ वेळेस सुनावणी झाली. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२३ ला न्यायालयाने होडिंग ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे शहरामध्ये असलेल्या अनधिकृत होडिंगवर कारवाई करता आली नाही.
आकाशचिन्ह या परवाना विभागाच्या वतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग अधिकृत करण्यासाठी अर्ज मागवले होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाने हे होर्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात व्यावसायिक न्यायालयात गेले. न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे ” आदेश दिले आहेत. त्यामुळे कारवाई करता आली नाही. अपघाताची बाब न्यायालयामध्ये मांडून त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.– शेखर सिंह, आयुक्त