पिंपरी (Pclive7.com):- पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पिंपळे सौदागर – रहाटणी प्रभागातील नाल्यांची साफसफाई अभियान सुरु करा अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पावसाळा काही दिवसावरच सुरु होण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे. या दिवसात चेम्बर्स, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन, नाले आदी तुडुंब भरून वाहत असतात. यामुळे सदर ड्रेनेज लाईन, स्ट्रोम वॉटर लाईन, नाले आदी तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे घाण पाणी सुरळीत पुढे न जाता बाहेर पडते व नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. तसेच त्यामुळे आरोग्य विषयक समस्याही उद्भवतात.
या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर – रहाटणी मधील सर्व नाले, स्ट्रोम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन साफ-सफाई करण्याबाबत अभियान राबविणे अत्यंत गरजेचे आहे. मागणीचे लेखी निवेदन शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.
या “साफसफाई” अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्ट्रोम वॉटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. आणि नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि परिणामी परिसरात आरोग्य विषयक समस्या उद्भवणार नाही असे काटे यांनी म्हटले आहे.