पिंपरी (Pclive7.com):- अंगाची लाही लाही होणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना थंड जिरा सोडा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी निगडी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कानडे, चिंचवड वाहतूक विभागाचे दत्तात्रय माळवदकर, संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंह, चिंचवड विधानसभा सचिव राकेश सायकर, कार्याध्यक्ष प्रविण अन्नदाते, चिंचवड विभाग उपाध्यक्ष उदय वाडेकर, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष आशिष सातकर, विनायक जगताप, केतन गायकवाड, सागर लोखंडे, अनुज शहा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गजाननभाऊ चिंचवडे यांनी सांगितले, की गेल्या चार पाच दिवसापासून उन्हाचा पारा चाळीशी पार झालेला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे चक्कर येणे, उष्माघाताचा सामना लोकांना करावा लागत आहे. पोलीस बांधवही उन्हाच्या झळा अंगावर झेलत वाहतूक नियमन करीत असतात. त्यांना उन्हामध्ये शरीराला थंडावा मिळून उन्हापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने पोलीस बांधवाना थंड पेय व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ऊन, वारा, पाऊस सोसत शहरातील रहदारी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे असे ते म्हणाले.