पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पूल, निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाण पूल आणि निगडी टिळक चौकातील मधुकर पवळे उड्डाण पुलाभोवती रंगीत दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. यासह विविध कामांच्या खर्चाना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंगळवारी (दि.२७) मान्यता दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. शहरातील उड्डाण पुलावर रोषणाई करून सुशोभीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत तीन उड्डाण पुलांवर रोषणाई केली जाणार आहे. विद्युत विभागाच्या या कामास आयुक्तांनी मंजुरी दिली.

पालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांना कौशल्य प्रशिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृता २.० अभियान अंतर्गत चिखली तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा येथील भामा आसखेड धरणाजवळ गट क्रमांक २८ पैकीमधील अँप्रोज ब्रीज व इतर अनुषंगिक कामाकरिता पालिका हद्दीबाहेरील जमिनीचे भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील विविध भागांतील ड्रेनेजलाईन व चेंबरची देखभाल व दुरुस्ती करण्यास तसेच, भुयारी गटार नलिका टाकणे व दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व तत्सम योजना अंमलबजावणीकामी एजन्सी नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. पिंपरीतील सावित्रीबाई फुले अकादमीकरिता पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
एमआयडीसीत उद्योजक पुनर्वसन इमारत..
भोसरी एमआयडीसी या औद्योगिक भागातील आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्रमांक २०१ येथे उद्योजकांच्या पुनर्वसनासाठी इमारत बांधण्यात येत आहे. या कामांतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा व विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्या खर्चास आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली.





















Join Our Whatsapp Group