पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने, गतीने होणारा विकास, शहराची वाढणारी लोकवस्ती, शहराची वाढणारी हद्द, शहरालगत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील झोन पोस्ट ऑफिस अपुरे पडत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना टपाल खात्याची सेवा प्रभावीपणे पुरविता येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र टपाल कार्यालय सुरु करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली.
टपाल खात्याच्या विशिष्ट सेवा, योजनाकरिता तसेच विविध सेवा संबंधीत तक्रारींचा पाठपुरावा करण्याकरिता शहरातील नागरिकांना पुणे शहरातील मुख्य टपाल कार्यालयशी (GPO) तसेच विभागीय टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा लागत आहे. हे कार्यालय शहरापासून खूप दूर आहे.
त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा, पैशाचा अपव्यय होतो. नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लोकांची होणारी गैरसोय पाहता, मी गेली अनेक वर्ष वेळोवेळी पत्रव्यवहार, ईमेल, करून शहरासाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी संचार मंत्रालयाच्या डाक विभागाकडे करीत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नवीन स्वतंत्र टपाल विभागाची निर्मिती केल्यास शहरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या टपाल खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ मिळण्यास येणारे प्रशासकीय अडथळे दूर होतील. तसेच नागरीकांच्या वेळेचा आणि पैश्यांचा अपव्यय टाळता येऊ शकतो, असेही नाना काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.