पिंपरी (Pclive7.com):- मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने आज (दि.०१) साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपळे सौदागर मधील पी.के. चौक येथे आज सकाळपासून भजन कीर्तनाच्या माध्यमातून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या टप्यात सरकारला ४० दिवसांचा कालावधी दिल्यानंतर सरकारने आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रात पाठिंबा म्हणून मराठा बांधवांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे.
पिंपळे सौदागर मधील सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणाला ग्रामस्थांनी, तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच भजन कीर्तनाने या उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली.