पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या विविध महत्वाकांशी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेली विकसित भारत संकल्प यात्रा आज काळेवाडी येथील ज्योतिबा गार्डन आणि किनारा कॉलनी येथे दाखल झाली. परिसरातील नागरिकांनी, मान्यवरांनी मोठ्या उत्साहात या यात्रेचे स्वागत केले आणि विविध योजनांचा लाभ घेतला. शहरात ६४ ठिकाणी आणि प्रत्येक प्रभागातील २ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन भेट देणार आहे. आतापर्यंत शहरातील विविध ठिकाणी या वाहनाने भेट दिली असून या उपक्रमाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामध्ये आधार कार्ड दुरूस्ती केंद्र, पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, स्वनिधी नोंदणी कॅम्प आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान पथविक्रेता, आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृता योजना आदी विविध योजनांचाही यामध्ये समावेश आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कुष्ठरोग, हिमोग्लोबीन, मलेरिया, डेंग्यू तसेच इतर रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. तरी या सुविधांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.