पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. यामध्ये २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांना महापालिकेकडून प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे २३ विद्यार्थी लाखाचे मानकरी बनले आहेत.
दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये देण्यात येतात. तर ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये व ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये देण्यात येतात. यंदा १८ शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये भोसरी माध्यमिक विद्यालयातील ५, कासारवाडी ३, संत तुकारामनगर १, पिंपळे गुरव ३, काळभोरनगर १, पिंपळे सौदागर ५, नेहरूनगर १, निगडी २, फुगेवाडी व रूपीनगर शाळा प्रत्येकी एक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ८५ ते ८९.९९ टक्क्यांमध्ये ६२ विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ८० ते ८४.९९ टक्क्यांमध्ये १०६ विद्यार्थी असून, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
चार शाळांचा निकाल १०० टक्के..
महापालिकेच्या १८ शाळांमध्ये चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये माध्यमिक विद्यालय कासारवाडी, संत तुकारामनगर, खराळवाडी व माध्यमिक विद्यालय क्रीडा प्रबोधिनी या शाळांचा समावेश आहे. तर ९० टक्क्यांच्या पुढे भोसरी माध्यमिक विद्यालय (९५.३९), पिंपळे गुरव (९५.१४), काळभोरनगर (९१.७२), पिंपळे सौदागर (९१.७७) नेहरूनगर (९४.११), केशवनगर (९६.९६), निगडी (९८.९७), फुगेवाडी (९७.५०) व लांडेवाडी माध्यमिक विद्यालय (९१.४८) यांचा समावेश आहे. तसेच सर्वांत कमी निकाल माध्यमिक विद्यालय, पिंपरीनगर (७०.८३) या शाळेचा लागला आहे.