पिंपरी (Pclive7.com):- आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव, भारतरत्न व भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे अस्पृश्यते विरोधात सत्याग्रह आंदोलन केले होते. जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी हे आंदोलन केले. या महामानवाचा अवमान करण्याचे पाप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
शंकर जगताप म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृतीच्या ग्रंथाचे दहन करताना भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आपल्या बाबासाहेबांचा अवमान केला. बाबासाहेब हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत. आदर्श महापुरुषाचा हा अवमान आम्ही कदापिही खपवून घेणार नाही.
या कृत्यावरून आव्हाडच्या मनात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. यानिमित्ताने त्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध केला आहे. आव्हाड यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.