पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजू दुर्गे, गणेश खरात, बंडू मारकड आदी उपस्थित होते.
राजू दुर्गे म्हणाले, सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, सकाळी १० वाजता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चिन्मय मुळये लिखित क्वीन ऑफ इंडो मिटेबल स्पिरिट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात येणार आहे.
दुपारी १२ ते २ यावेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मावळ तालुक्यामध्येही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.