पिंपरी (Pclive7.com):- एसटी स्थानकावर काकडी विकणे, घरोघरी जाऊन पेपर टाकणे अशी पडेल ती कामे करून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे अमित गोरखे आता विधान परिषदेत आमदार झाले आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी घेतलेली भरारी लक्षवेधी आहे. अविश्रांत श्रम करून, इच्छित ध्येय साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत…
एका सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये ४ नोव्हेंबर १९८० रोजी मुंढवा येथे अमित गोरखे यांचा जन्म झाला. आई अनुराधा आणि वडील गणपत गोरखे हे नगर जिल्ह्यातील लोणी व्यंकनाथ या गावचे. गणपत गोरखे हे मुंढव्यातील भारत फोर्जमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. अमोल आणि अश्विनी हे दोघे अमित गोरखे यांची भावंड. १९८२ मध्ये गणपत गोरखे यांनी भारत फोर्जमधील नोकरी सोडून चिंचवडच्या रस्टन ग्रीव्हज कंपनीत वॉचमन म्हणून रुजू झाले. चिंचवडला ते एका पत्र्याच्या घरात स्थायिक झाले.
चिंचवड येथील महापालिकेच्या काळभोरनगरच्या स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत अमित गोरखे यांचे चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झाले, आणि पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमए व एमबीए केले. या शैक्षणिक प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करीत त्यांनी कच्ची दाबेली विकणे, घरोघरी वृत्तपत्र टाकणे, एसटी स्थानकावर काकडी विकण्याचेही काम त्यांनी केले. दरम्यान, २००३ मध्ये चिंचवड येथे दोन गाळे भाड्याने घेऊन, संगणकाचे क्लासेस सुरू केले. महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणही दिले. काळभोरनगर, चिंचवड येथील राष्ट्रतेज मंडळाच्या माध्यमातून जिवंत देखाव्याची संकल्पना त्यांनी लोकप्रिय केली होती. तेथेच कलारंग या सांस्कृतिक संस्थेची निर्मिती झाली. शहरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम कलारंग संस्थेने त्यावेळेपासून चालू केले. कलारंगच्या माध्यमातून आजपर्यंत २०० हून अधिक प्रतिष्ठित कलाकारांना ‘कलागौरव’ पुरस्काराने गौरविले आहे.
नोव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च या शैक्षणिक ट्रस्टची स्थापना त्यांनी २००२ मध्ये केली. त्यांच्या संस्थेतून केजी ते पीजीपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आहेत. मागासवर्गीय समाजासाठी कार्य, गृहिणींना संगणक प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्य यासाठी त्यांना २०१२ मध्ये केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात आला.
अमित गोरखे यांनी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरवात केली. संस्कार भारती या संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पेलली आहे. भाजपचे प्रदेश सदस्य ते प्रदेश सचिव असा प्रवासही त्यांनी केला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळावर अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. २०१२ मध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन आणि बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘एमजीडी’ या संस्थेच्या माध्यमातून मॉस्को शहरातील शासकीय वाचनालयात फडणवीस यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण हे त्यांचे राजकीय क्षेत्रातील आदर्श आहेत. देवेंद्र फडणवीस यांना ते गुरुस्थानी मानतात.
(शब्दांकन – प्रा. वैभव फंड, निगडी.)