पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचे नाव आता जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात अभिमानाने घेतले जाते याची पायाभरणी कर्मयोगी स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांनी केली. त्यांचा वारसा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कर्तव्यनिष्ठ भावनेने आणि जबाबदारीने पुढे चालवत आहे. या संस्थेने मागील वर्षांमध्ये हजारो सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडवले. हे आमचे माजी विद्यार्थी देश, परदेशात सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी विविध विकास प्रकल्पामधून काम करीत आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहेत. याचा पीसीईटीच्या सर्व विश्वस्त मंडळाला आणि प्राध्यापक, कर्मचारी वर्गाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक कर्मयोगी स्व.शंकरराव (भाऊ) बाजीराव पाटील यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे आणि साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्यासह पीसीईटीच्या सर्व कॉलेजेसचे संचालक, प्राचार्य, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. तसेच साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्व. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या प्रतिमेस पीसीयू चे कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, डॉ. सुदीप थेपाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पीसीयूचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्व. शंकरराव पाटील यांनी १९९० मध्ये पीसीईटीची स्थापना केली. ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या १३ शाखा आता कार्यरत आहेत. २०२३ मध्ये पीसीयूची स्थापना करण्यात आली येथे मागील वर्षी तेथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यावर्षी एकूण ३३०० पेक्षा जास्त विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी यावेळी दिली.