पिंपरी (Pclive7.com):- मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने नेहरूनगरमध्ये सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस असा ५० हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दिलीप उर्फ पाजी उर्फ सरदार इंद्रजीत चौहाण (वय २९ वर्षे रा. नेहरुनगर पिंपरी) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आगामी विधानसभा निवडणुक व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखांना दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक तयार करुन विशेष मोहीम राबवली. (दि.१३) रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांना खबर मिळाली कि, एक व्यक्ती अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा पिस्टल सारखे हत्यार कमरेला लावुन एच ए ग्राउंड नेहरुनगर पिंपरी येथे आला आहे. त्यानुसार पोलिसांनी एच ए ग्राउंड नेहरुनगर पिंपरी येथे सापळा लावला. त्यानुसार तो संशयित तेथे आल्यावर पोलीसांच्या पथकाने पाठलाग करुन अत्यंत धाडसाने व शिताफीने आरोपीला पकडले. त्यावेळी त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल व जिवंत राउंड पोलिसांनी ताब्यात घेतले असता तो दिलीप उर्फ पाजी उर्फ सरदार इंद्रजीत चौहाण असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली.
मोक्काच्या गुन्ह्यात दिलीप उर्फ पाजी उर्फ सरदार इंद्रजीत चौहाण हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पळुन गेला होता. वेळोवेळी त्याची राहण्याची ठिकाणे बदलुन, त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. पोलिसांनी त्याच्याकडून ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असे एकूण ५० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, दिलीप चौधरी, उषा दळे, अजित सानप, नामदेव कापसे, देवा राऊत यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group