पिंपरी (Pclive7.com):- अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एका कारसह सात पिस्तूल, १४ जिवंत काडतूसे आणि दोन मॅक्झिन असा एकूण १५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. प्रदिप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (२८, रा. आपटी, ता. शिरुर), सुरज अशोक शिवले (२४, रा. आपटी), नवल विरसिंग झामरे (२३, रा. पेरणे फाटा. ता. शिरुर, मुळगाव मध्यप्रदेश), कमलेश उर्फ डॅनी कानडे (२९, रा. भारतमाता चौक, मोशी), पवन दत्तात्रय शेजवळक (३५, रा. नारायणगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव, आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ आणि अधिकारी, अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत होते. त्या वेळी पथकातील पोलिस शिपाई गणेश सावंत, हर्षद कदम आणि सुमित देवकर यांना गुप्त बातमिदाराकडून आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरिक्षक अभिनय पवार, पोलिस उपनिरक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार अशिष बनकर, विनय वीर, सुमित देवकर, गणेश सावंत, हर्षद कदम, रामदास मोरे, नितीन लोखंडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, सात काडतुसे आणि दोन मॅक्झिन जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता नवल झामरे हा मध्यप्रदेशातून पिस्तूल घेऊन येत शहरात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने आरोपी कमलेश उर्फ डॅनी कानडे याच्या मार्फतीने पवन शेजवळक याला एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस दिले होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तसेच, झामरे याच्याकडून आणखी तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
शेजवळ आणि कानडे सराईत
आरोपी पवन शेजवळ आणि कमलेश कानडे हे सराईत आहेत. आरोपी शेजवळ याच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे नोंद आहेत. तर, कानडे याच्याबर मंचर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.






















Join Our Whatsapp Group