पिंपरी (Pclive7.com):- शाहूनगर येथील डी. वाय. पाटील स्कूल शाळेमध्ये अन्न पदार्थातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवार (दि.१०) घडली. विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

डी. वाय. पाटील स्कूलमध्ये नवरात्रीनिमित्त फुड फेस्टिवलचे आयोजन केले होते. इयत्ता पाचवी आणि नववीतील विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. सकाळी नऊ वाजता ब्रेड आणि चटणी खाल्ल्यानंतर २६ विद्यार्थ्यांना उलट्या सुरु झाल्या. काहींच्या पोटात दुखू लागले. विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ सारखं वाटून भोवळ येऊ लागल आहे. एकावेळी येवढ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यामुळे शाळा प्रशासनाने खासगी रुग्णालयात संपर्क साधला आणि रुग्णवाहिका बोलावून घेतली. एकूण २६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना सकाळी माहिती दिली. माहिती मिळताच, विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांची अवस्था पाहुनही पालकही बेभान झाले होते, याच निकृष्ट दर्जाच्या सँडविच मधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी त्या विद्यार्थ्यांना तपासले असता, त्यांना सँडविच मधून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने शाळेकडे चौकशी केली. हे सर्व विद्यार्थी १० ते १४ वयोगटातील असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.






















Join Our Whatsapp Group