पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराचे औद्योगिकनगरी हे नाव सार्थ ठरविण्यामध्येही महत्त्वपूर्ण वाटा असलेले उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहून निगडी, प्राधिकरणातील गरबा, दांडियाचा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. उपस्थितांनी टाटा यांच्या प्रती आदर व्यक्त केला.

श्री दुर्गेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे. दररोज रात्री आरतीनंतर नऊ वाजता गरबा, दांडियाचा कार्यक्रम होत असतो. गुरुवारी रात्रीची आरती डॉ.सुनील काळे, शरद सावरकर, श्याम देशमुख, परेश अगरवाल यांच्या हस्ते झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे पदाधिकारी विक्रांत कळंबकर, हभप किसन महाराज चौधरी, भास्कर रिकामे, चंद्रशेखर जोशी, आनंदा साळुंखे, बाळासाहेब धुमाळ, प्रमोद कडेकर यावेळी उपस्थित होते.
जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. व्यासपीठावरील सर्व उपस्थितांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करत गरबा, दांडियाचा आजचा कार्यक्रम रद्द केला. माजी नगरसेवक अमित गावडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचे औद्योगिकनगरी हे नाव सार्थ ठरविण्यामध्ये टाटा उद्योग समूहाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक लघुउद्योग शहरात सुरू होऊन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. अनेकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यामुळे मदत झाली. परोपकारी वृत्ती, सामाजिक बांधिलकी, सचोटी, जिद्द, नैतिकता, उद्यमशीलता, संयम, साधेपणा, नम्रपणा यांचा अपूर्व संगम असलेले तसेच समाजसेवेप्रती समर्पित असलेले हे बहुआयामी अलौकिक व्यक्तिमत्व सर्व समाजासाठी आदर्श होते. यशाच्या शिखरावर असताना देखील एक उत्तम माणूस म्हणून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने उद्योग विश्वातील लखलखता तारा निखळला आहे.
Tags: अमित गावडे






















Join Our Whatsapp Group