भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या १०५ मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर ११ आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास ११० जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले. देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले होते.
भाजपकडून ११० जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ३० टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्या जागांबाबत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्याशी चर्चा होणार..
भाजपचे बहुतांश उमेदवार ठरल्यानंतर आता राज्यातील भाजपच्या नेत्यांची चर्चा संपली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या जागांवर वाद आहे त्या जागांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील महायुतीच्या मित्रपक्षांचीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने अधिकच्या जागांवर दावा केल्याची माहिती आहे.






















Join Our Whatsapp Group