चिंचवड (Pclive7.com):- २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघांतर्गत ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७७ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ डी भरुन गृह मतदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ मतदारांनी गृह मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करु शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
मतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनीही निवडणूक आयोगाने केलेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.






















Join Our Whatsapp Group