पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्यावर ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क केल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून आता अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेकडून आता २५ टोइंग व्हॅन या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आता अशा दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, ही आयटी पार्क क्षेत्रे असुन देहु व आळंदी हि संतांची भुमी असुन पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत मोठमोठ्या बाजारपेठा तसेच शैक्षणीक व व्यापारी संकुले असुन नामांकित अशी हॉस्पीटल्स आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्गत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून नागरीक आपली दैनंदिन कामे करण्या करिता त्यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करत असतात. पिंपरी चिंचवड शहरात नागरीक ठिकठिकाणी आपले दुचाकी तसेच चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे तसेच बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी पार्क करत असल्याने वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ‘टोईंग व्हॅन’द्वारे कारवाई सुरू करण्यात येत आहे. बेकायदेशीर व वाहतुकीस अडथळा होईल अशी पार्किंग करण्यात आलेली वाहने दंड आकारुन टोईंग करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कारवाहीसाठी एकुण २५ वाहने वापरण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये एकुण ०८ वाहने वापरण्यात येत असून टप्याटप्याने व आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढवण्यात येत आहे.
इतका दंड आकारण्यात येणार..
दुचाकी वाहन टोईंग केल्यास सदर वाहनांस ५०० रु दंड व २०० रु टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून ३६ रुपये जी.एस.टी असा एकुण ७३६/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच चारचाकी वाहनांकरीता ५०० रुपये दंड व ४०० रुपये टोईंग चार्ज आकारण्यात येणार असून ७२ रुपये जी.एस.टी असा एकुण ९७२/- रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच टोईंग कारवाई केलेल्या वाहनांवर पुर्वीचे चलन प्रलंचित असेल तर प्रलंबित चलनापैकी किमान एक चलन हे टोईंग वेळच्या चलनासोबत भरणे बंधनकारक असणार आहे.
तरी नागरीकांनी आपली वाहने बेकायदेशीरपणे व वाहतुकीस अडथळा होईल याप्रमाणे न लावता योग्यरितीने पार्क करावेत असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.