पिंपरी (Pclive7.com):- सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस यापुढे स्वतःचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकणार आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या विविध शाखांना दिले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या वाढदिवसाकरिता सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस दल हे प्रशासनिक दृष्ट्या व नागरिकांप्रती जागरूक राहून काम करीत असते. वेळप्रसंगी त्यांना वैयक्तिक कामे असतानाही ते रजेवर जाऊ शकत नाहीत. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बरेचदा स्वतःचे वाढदिवस असतानाही कामाकरिता हजर होणे व आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही. तसेच दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे त्यांना त्यांच्या वाढदिवस, करिता सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.
पूर्वसंध्येला होणार पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा
वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी हे पोलीस ठाण्यातील ज्यांचा वाढदिवस आहे. त्या अधिकारी व कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश हे संबंधितांना देतील, असेही पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.