चिंचवड (Pclive7.com):- जुन्या वादाच्या कारणातून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना ८ डिसेंबर रोजी वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.
शुभम कुऱ्हाडे राठी, सारंग कुऱ्हाडे राठी (दोघे रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी शंतनू जगन्नाथ वायदंडे (वय १९, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या कारणावरून शुभम राठी याने शंतनू यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर सारंग राठी याने शंतनू यांना बांबूने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी शंतनू यांना शिवीगाळ केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.