पिंपरी (Pclive7.com):- वडिला पेक्षा जास्त वय…चौदा वर्षाची मुलगी… वंशाचा दिवा पाहिजे असल्याने दुसऱ्या लग्नाची अपेक्षा… मोठी स्वप्ने दाखवल्याने आई-वडिलांच्या डोक्यात खुळ… पुण्यात आलिशान फ्लॅट मिळणार, कर्ज फेडणार ही समजूत…यातूनच पोटच्या १९ वर्षीय मुलीचे इच्छेविरुद्ध ४६ वर्षीय व्यक्तीशी लावून दिलेला विवाह. हा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथे उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आई वडिलांसह पंधरा जणांविरुध्द तक्रार दिली आहे.
दिप्ती गायकवाड (१९, रा. जुनी सांगवी) हिने फिर्याद दिली आहे. तर आई अनिता गायकवाड (३६), वडील दयानंद गायकवाड (४६), शामा मच्छिंद्र माने (५४), मच्छिंद्र माने (४६), रवी माने (२९) शामल रवी माने (२५ रा.पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (३०), राहुल भांडळे (३१), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजणा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईवडिलांनी दिप्तीचे लग्न तिच्या परस्पर ठरवले. त्या लग्नास तीचा विरोध होता. दीप्तीने नवऱ्या मुलालाही पाहिलेले नव्हते. ‘स्थळ आहे, तुला लग्न करायचे आहे’, असे सांगून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम विठ्ठल माने यांना दाखविले. होणारा नवरा वडिलांपेक्षा वयाने मोठा असल्याचे दिसल्याने तिने लग्नास विरोध केला. त्यावेळी तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल,’ अशी धमकी दिली. २२ मार्च २०१८ रोजी दीप्तीचे आळंदी येथे जबरदस्तीने नेऊन लग्न लावून दिले. २० एप्रिलला दीप्तीने सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















Join Our Whatsapp Group