पिंपरी (Pclive7.com):- अत्याचारापासून कोवळ्या, निरागस लहान मुलींचे संरक्षण व्हावे, म्हणून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) कठोर करण्यात आला आहे. १२ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास नराधमाला फाशीची शिक्षा करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल सरकारने उचलले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचे नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडेल्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. प्रस्तावानुसार १२ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा, १२ ते १६ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास १० ते २० वर्षांची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे. तसेच, बलात्काराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढली जावीत. यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
या संदर्भात सरकारचे अभिनंदन करताना नगरसेविका अनुराधा गोरखे म्हणाल्या की, “खेळण्या-बागडण्याच्या वयात कधी आपल्या नातलगांकडून, परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणा-या अत्याचाराला लहान मुलींना सामोरे जावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशाचे उज्ज्वल भविष्य असलेल्या मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लहान मुलींवर अत्याचाराचा विचार करणा-या नराधमांना वचक बसेल. तसेच, कोणी अशा निरागस मुलींवर अत्याचार केला. तर, त्यांना कठोर शासन म्हणजे थेट फाशीचीच शिक्षा होणार आहे. त्यामुळे बलात्कारी प्रवृत्तीच्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे”.






















Join Our Whatsapp Group