पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यभरात पक्षाअंतर्गत निवडणुका सुरु आहेत. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचा देखील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्याकडेच पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. त्यांच्या फेरनिवडीचा पक्षाच्या निवडणूक अधिका-याच्या उपस्थितीतील बैठकीत ठराव केला असून अंतिम निर्णयाचे अधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर वाघेरे यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून समजते.
राष्ट्रवादीच्या शहर, जिल्हा व प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे-पाटील यांची मे २०१५ मध्ये नियुक्ती झाली होती. यावर्षी त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे वाघेरे यांची पुन्हा शहराध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. शहरातील पदाधिका-यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्यानंतर वाघेरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीतील पडझडीनंतर त्यांनी पक्षबांधणी करण्याकडे लक्ष्य दिले. परंतु, महापालिका निवडणूक जवळ येताच निम्म्या नगरसेवकांनी पक्षांतर केले. अशा पडत्या परिस्थितीत संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक ३६ नगरसेवक निवडून आले.
नुकत्याच पिंपरी चिंचवड शहरात संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाच्या दोन्ही सभा यशस्वी पार पडल्या. या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहराध्यक्षपदी संजोग वाघेरे यांची फेरनिवड केली जाणार आहे. पक्षाने पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना पाठविले होते. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी पक्षाच्या शहरातील नेत्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीत शहराध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये सर्वांनी संजोग वाघेरे यांची फेरनियुक्ती करण्याचा एकमताने ठराव पारित केला आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षासाठी शहराध्यक्षपदाची धुरा पुन्हा वाघेरे यांच्याकडे दिली जाणार असल्याचे, जवळपास निश्चित आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर वाघेरे यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचे, राष्ट्रवादीमधील सूत्रांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group