पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजप राबवू पहात असलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प ‘वेस्ट टू मनी’ प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नसून ज्या पध्दतीने तो राबविला जाणार आहे त्याला विरोध आहे. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प यशस्वी होणार नसून जनतेच्या पैशाची केवळ लूट होणार आहे. भाजपाच्या मंडळीना यात मोठा मलिदा खायला मिळणार आहे. अशी टिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, सल्लागार भगवान वाल्हेकर, जितेंद्र ननावरे, नगरसेवक सचिन भोसले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रेखा दर्शिले, रोमी संधू, माजी नगरसेवक किरण मोटे आदी उपस्थित होते.
वेस्ट टू एनर्जी या बहुचर्चित प्रकल्पाला नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभेत मंजूरी देण्यात आली. मात्र त्यावरून आता बरेच राजकारण पेटले आहे. शिवसेनेच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीवर हल्लाबोल करण्यात आला. खासदार आढळराव पाटील म्हणाले, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. परंतू ज्या पध्दतीने ही प्रक्रीया राबविली जात आहे त्याला विरोध आहे. एवढा मोठा प्रकल्प राबविला जात असताना शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना डावलण्यात आले. बेंगलोरच्या धर्तीवर राबवावा, टिपिंग फी मध्ये गौंडबंगाल आहे. सत्ताधारी भाजपच्या नेते मंडळींचा यात सहभाग आहे. अशा स्वरूपाचा प्रकल्प देशात कुठेही यशस्वी झालेला नाही. ४ बड्या नामवंत कंपन्या यात निविदा भरण्यासाठी आल्या होत्या. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांना धमकावून बाहेर काढले. भाजपच्या तीन संगणक किड्यांनी याची निविदा प्रक्रीयाच हँक केली आहे. या प्रक्रियेत मोठा गोंधळ आहे. वेस्ट टू एनर्जी, मोशी कचरा डेपो, तिथे लागणारी आग, दुर्गंधी याच्याशी भाजपवाल्यांना काहीच देणंघेण नाही. जे स्वप्न म्हणून याकडे बघत आहेत त्यांना पैसा कमवायचा आहे. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. जनतेच्या पैशाची मोठी लूट यातून होणार आहे. महापालिकेचे आयुक्त यातील जाणकार होते, मात्र त्यांनी ध्रुतराष्ट्रची भूमिका घेतलीय.
पुढे ते म्हणाले, महापालिकेचा कारभार चुकीच्या लोकांच्या हाती गेलाय. टीम बदलली परंतू खेळाडू तेच आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकरणी मुख्यमंत्री तसेच पर्यावरण मंत्री यांच्याकडे दाद मागणार असून या निविदा प्रक्रीयेची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे खासदार आढळराव पाटील म्हणाले.






















Join Our Whatsapp Group