कामातील सर्व अडथळे झाले दूर, मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतलेले पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपूल बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. या उड्डाणपुलाचे सबस्ट्रक्चरचे काम ८०% पूर्ण झाले आहे. उर्वरित २०% काम हे रेल्वे विभागाशी सलग्न आहे. सुपर स्ट्रक्चर चे २५% पूर्ण झाले असून मार्च अखेर पर्यंत ५५% काम पूर्ण होणार आहे. तसेच रस्त्याचे काम ६० % झाले असून उड्डाणपुल व रस्त्याचे उर्वरित काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून हा उड्डाणंपूल नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे कामाबाबत कार्यादेश मार्च २०२३ मध्ये देण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाचे कामास काही वृक्षांचा अडथळा येत होता. या पुलाच्या मान्य रेखाचित्रानुसार पुलाच्या बांधणीमध्ये अडथळा ठरणारे अस्तित्वातील जागेवरील वृक्ष काढणेविषयी / पुनर्रोपण करणेबाबत ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आली. एकूण पुर्णपणे काढावयास लागणाऱ्या वृक्षांची संख्या १४२ वृक्ष इतकी होती. तसेच पुनर्रोपण करावयाच्या वृक्षांची संख्या ६४ वृक्ष इतकी होती.
पुलाच्या बांधणीने बाधित होणारे वृक्ष हे संरक्षण विभागाच्या हद्दीत असल्याने झालेल्या करारानुसार सदरच्या वृक्षांचे मुल्य संरक्षण विभागाकडे जमा केलेनंतर वृक्ष काढावयाची परवानगी संरक्षण विभागाकडून मिळणार होती. त्यानुसार या वृक्षांचे मुल्यांकन वन परिक्षेत्र अधिकारी पुणे यांचेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आले. या प्रस्तावास पाठपुरावा करुन वृक्ष काढावयाची परवानगी मार्च २०२४ मध्ये मिळाली. त्यास अनुसरुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मे २०२४ रोजी सदरचे १४२ वृक्ष काढुन घेतले. तदनंतर त्या जागेतील पूलाच्या पायाचे काम सुरु करण्यात आले. तसेच वृक्षांच्या पुनर्रोपणाच्या सूचना संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार नोव्हेंबर २०२४ रोजी पुर्ण करुन घेण्यात आले. सर्व वृक्षांचे पुनर्रोपण हे संरक्षण विभागाच्या हद्दीमध्ये करण्यात आलेले आहे.
तसेच हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने रेल्वे विभागातील विविध विभागांशी समन्वय साधून सर्व विभागांची मान्यता मिळाली. त्यानंतर या पुलाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. सदरचा पूल मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर लोहमार्ग फाटकासमोर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
वाहनचालकांना मिळणार दिलासा..
पिंपरी डेअरी फार्म येथील लोहमार्गावर पूल उभारल्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वे सिग्नलवर थांबण्याची गरज राहणार नाही. यामुळे नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. हा पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील डेअरी फार्म, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी आणि पिंपरी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
असा होईल फायदा..
– पिंपरी चौकातील वाहतुक कोंडी कमी होईल.
– पुणे मुंबई रस्त्याकडून पिंपरी गावात जाण्यासाठी अस्तित्वात असणारे मुंब़ई पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद होणार असल्याने नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल.
– पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी गावातील नागरिकांना पुणे मुंबई रस्त्याला पोहोचण्यासाठी जवळचा पर्याय उपलब्ध होईल.
– शगुन चौकमार्गे इंदिरा गांधी पुलावरुन पुणे मुंबई रस्त्याला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी होईल.
– संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी गावातील नागरिकांना लवकरात लवकर पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सुविधांचा विचार करून या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. महापालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे हा पूल वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या प्रकल्पामुळे पिंपरीतील वाहतुकीची समस्या सुटेल आणि परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपरी येथील नागरीकांना संत तुकाराम मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचणे सोपे होणार आहे.
– विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका