पिंपरी (Pclive7.com):- सत्यशोधक व भारतातील आद्य कामगार चळवळीचे जनक व कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची १२८ वी पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे स्मरण केले पाहिजे. यांच्या प्रेरणेनेच पुढील काळात कामगार संघटनांचा लढा सुरु राहिल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, त्याकाळी उद्योग नवे होते, कष्ट नवे होते, स्थलांतरीत जनतेसाठी हे सर्व नवीन होते. कामाचे तास नव्हते, त्यांचे नियम नव्हते, शोषणालाही आर्थिक व जातीय पदर होते. कामगार वस्त्या गावानुरुप व जातीनुरुप वेगवेगळ्या होत्या. महिला कामगारांना कोणत्याही सोयी नव्हत्या. औद्योगिक कायदेच नव्हते तर न्याय कोणत्या कायद्याच्या आधारे मागायचा? हा मोठा प्रश्न होता. अशा सर्वतहेच्या विपरित अवस्थेत नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतीय कामगार चळवळीची मुहूर्तमेढ महात्मा फुलेंच्या विचारांच्या आधाराने केली होती.
नारायण मेघाजी लोखंडेंनी कामगार – कष्टकऱ्यांचे कामाचे तास निश्चित केलेत, श्रमाचे योग्य मुल्य मिळवून दिले. साप्ताहिक व हक्काची सुटी मिळवून दिली. स्त्री कामगारांच्या शोषणाला व कामगारांच्या आपसातील स्पृश्यास्पृश्य भावनेला आळा घातला. कामगार -कष्टकऱ्यांना रास्त हक्काची मागणी व रास्त आंदोलन कसे करावे याचे वळण लावले. परंतु ऐवढ्या संघर्षातून मिळालेले कामगार कायदे आता केंद्र सरकारने प्रचलीत कामगार कायदे रद्द करुन चार कामगार संहित कायद्यात आणून भांडवलदारांना पुरक कायदे करण्याचा घाट घातला आहे. हे सुधारीत कामगार कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत. यासाठी कामगारांनी एकजूटीने लढले पाहिजे. भांडवलदारांच्या दबावात येऊन केंद्र सरकार कामगारांचे हक्क डावलून कायद्यात बदल करु इच्छित आहे. हे कायदे रद्द करण्यासाठीच आणखी तीव्र लढा उभारण्याचा संकल्प कामगार नेते “रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे” यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करावा, असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.
यावेळी हिंद कामगार संघटनेचे यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, कामगार प्रतिनिधी किरण भुजबळ, विकास साखरे, सोपान बरब्दे, कुणाल ललवाणी, संतोष पवार, विजय मोकळे, तानाजी लोखंडे, विठ्ठल गुंडाळ, राजू मोहिते, सुरेश तरडे, जगन्नाथ हडप, शेखर मांढरे, संतोष खेडकर आदी उपस्थित होते.
Tags: कैलास कदम





















Join Our Whatsapp Group