पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची, रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची आणि सेलिब्रेशनच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्याची जणू प्रथाच बनली आहे. बरं हा सगळा धिंगाणा बहुतांश वेळी पोलिसांनी नजरेस पडत नाही. आता हे बर्थडे सेलिब्रेशन धन दांडग्यांचे असल्यानं पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत ही खबर पोहचू न देण्यासाठी ही खटाटोप सुरु असतो, हे उघड आहे. पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केलाय, तो पण थेट पोलीस स्टेशनच्या दारातचं..

अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल असं ड्रोनद्वारे या बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरण ही केलंय अन सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी हा प्रताप केला आहे, ज्यामुळं अख्ख्या पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या प्रकरणी काही कठोर कारवाई करतात का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

बुधवारचा दिवस संपताना आणि गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटील यांची मित्रमंडळी सांगवी पोलीस स्टेशन समोर जमू लागली. अशात पोलीस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय १२ च्या ठोक्याला प्रवीण यांच्यासह मित्र मंडळी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं. दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि आयटम बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रिल्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही, असं कसं होईल. हे सगळं ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलं, भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर हे व्हिडीओ अपलोड होऊ लागले.

पिंपरी चिंचवड शहरात रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं फॅड आहेच. पण काल रात्री साजरा झालेला बर्थडे हा पोलीसाचा असेल असं कोणी स्वप्नात ही विचार केला नव्हता. बरं पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना, इतर पोलिसांचे कान अन डोळे बंद होते का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. बरं या महाशयांनी हा व्हिडीओ स्टेट्सला ठेवला. त्यामुळं पोलीस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे समाजासमोर आलं. आता नेहमीप्रमाणे ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत कोणी पोहचू दिलीच नाही. परंतु Pclive7.com च्या हाती हा व्हिडीओ लागला अन् पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. हा व्हिडिओ पाहून वरिष्ठांना ही धक्का बसला पण या व्हिडीओमुळं अख्ख्या पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. त्यामुळं पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या पोलीस महाशयांवर काय कठोर कारवाई करतात का? आणि यानिमित्ताने रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालत, साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पाडणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.





















Join Our Whatsapp Group