पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपपासून फारकत घेण्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच, भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी ‘विधी’ समिती सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. महापौर नितीन काळजे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर देखील केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये ‘ना’राजीनामा सत्र सुरुच आहे. सुरुवातीला नगरसेवक शीतल शिंदे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांना डावलण्यात आल्यामुळे महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामे दिले होते. शिंदे यांनी देखील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याचे कारण देत ‘स्थायी’ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या विषय समिती सदस्यांच्या निवडीतही राजीनाम्यांचे सत्र सुरू राहिले. विधी समिती मागितली असताना क्रीडा समिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्तीनंतर पाच मिनिटांत राजीनामा देऊ केला. पात्र असूनही निष्ठावान नगरसेवकांना डावलले जात आहे. आयारामांना पायघड्या घातल्या जात असल्याचा, आरोपही त्यांनी केला होता. आता भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी मंजूर देखील केला आहे.






















Join Our Whatsapp Group