पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसवेक बाळासाहेब ओव्हाळ यांनी भाजपपासून अलिप्त राहण्याची घोषणा केली असून त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाशी कसलाही संबंध नाही. ओव्हाळ यांनी नुसती स्टंटबाजी करण्यापेक्षा स्वाभिमान बाळगून भाजपच्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. तसेच स्वत:च्या हिंमतीवर प्रभागातून निवडून येऊन दाखवावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे यांनी ओव्हाळ यांना केले आहे.
महापालिकेतील सभागृह नेत्याच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांता सोनकांबळे बोलत होत्या. यावेळी बाळासाहेब भागवत, के. एम. बुक्तर, अजीज शेख, लिंबराज कांबळे, विलास कांबळे, अल्ताफ शेख, राजेंद्र कांबळे, एम. पी. कांबळे, अशोक गायकवाड, सिंकदर सूर्यवंशी, केतन कांबळे, अतुल जाधव, रमेश चिमुरकर, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते.
नगरसेवक ओव्हाळ हे आरपीआयचे पदाधिकारी नसताना देखील आरपीआयच्या कोट्यातील नगरसेवक पदावर भाजपकडून संधी मिळाली आहे. तरीदेखील त्यांनी भाजपपासून अलिप्त राहण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सभागृहात आरपीआयची भूमिका मांडली नाही तसेच पक्ष संघटनेतही त्यांचे कोणतेही योगदान नाही. त्याचा पक्षाला फटका बसला आहे. एका वर्षात त्यांना भाजप अत्याचारी, जातीयवादी पक्ष वाटू लागला आहे. पुणे शहरात रिपाइंचे पाच नगरसेवक व्यवस्थित काम करताना ओव्हाळ यांना भाजपबद्दल तिरस्कार वाटतो आहे. त्यांना राग असेल आणि खरा स्वाभिमान असल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. भाजपपासून अलिप्त राहून नगरसेवक पद कायम ठेवण्याची त्यांची दुटप्पी भूमिका योग्य नाही. त्यांचा चळवळीशी काही संबध नसून रिपाइंची भूमिका कधी त्यांनी महापालिकेत मांडली नाही. त्यामुळे रिपाइंच्या नावाखाली स्टंटबाजी करून समाजासाठी काही वेगळे करत असल्याचे त्यांनी दाखवू नये, अशी टिका सोनकांबळे यांनी यावेळी केली.






















Join Our Whatsapp Group