तळेगाव (Pclive7.com):- “संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांना अधिक चांगला ऊस दर मिळावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसेच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ आयोजित महायुती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. वडगाव मावळ शासकीय विश्रामगृहाच्या आवारात महायुतीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, आरपीआय नेते सूर्यकांत वाघमारे, भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, विठ्ठल शिंदे, सुरेश चौधरी, संतोष दाभाडे, भरत येवले, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण ठाकर, बाबूलाल नालबंद, शरद हुलावळे, अरुण लाड, विलास बडेकर, बबनराव ओव्हाळ, देविदास कडू, महादूबुवा कालेकर, रामनाथ वारिंगे, सुनील ढोरे, नामदेव घुले, काळूराम मालपोटे, मारुती देशमुख, दिपाली गराडे, माऊली ठाकर, तुकाराम आसवले, संभाजी शिंदे, राजू चव्हाण, उमा मेहता, आरोही तळेगावकर उपस्थित होते. तसेच संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्या माऊली दाभाडे, हभप छबन महाराज कडू, लक्ष्मण भालेराव, उमेश बोडके, भरत लिम्हण, संदीप काशीद, शोभाताई वाघोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय निवडणुकीतील उमेदवार चेतन भुजबळ यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.
आमदार शेळके यांच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदाच्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांनी पॅनलच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत, “महायुती सरकारच्या पाठिंब्याने हा पॅनल निवडून आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पारदर्शक कारभार करा. खर्च न करता संचालक झालात, त्यामुळे अधिक जबाबदारीने काम करा,” असे ते म्हणाले.
“आपल्याकडे पुढारी कमी आणि पदे जास्त आहेत. त्यामुळे शासकीय समित्या व अन्य पदांवर सर्वांना संधी मिळेल. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही योग्य सन्मान मिळेल,” अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.
यावेळी त्यांनी जातीपातीवर आधारित राजकारण टाळण्याचे आवाहन केले. “विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही सन्मान मिळेल,” असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी, “वेळ पडल्यास लोकहितासाठी मोर्चा काढावा लागला तरी मागे हटणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळावी, अशी मागणी केली. रमेश साळवे यांनी मावळ तालुक्याला भविष्यात मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. भास्करराव म्हाळसकर यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
सूर्यकांत वाघमारे यांनी कारखान्याच्या माध्यमातून मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करून तालुक्याच्या प्रगतीस चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माऊली दाभाडे यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा पुरविल्या जातील, असे सांगितले.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांच्यासह पॅनेलच्या उर्वरित तिन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचे निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.