ऑनलाइन स्वरुपामध्ये कर भरण्यास करदात्यांची पसंती; महानगरपालिकेकडून करदात्यांचे आभार…
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ९६६ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. तब्बल ६ लाख ३० हजार २९४ मालमत्ताधारकांपैकी ५ लाख ०२ हजार ०२८ व ९२ हजार ४६५ नव्या आकारणी झालेल्या मालमत्तांधारकांमधून ६० हजार ७२ मालमत्तांनी ९८ कोटींचा कराचा जागरुकपणे भरणा केला असून त्यांचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी करसंकलन विभागाने विविध कार्यपध्दती अंवलबविली असून यामध्ये सर्वप्रथम बिगरनिवासी, औद्योगिक व मिश्र मालमत्तांना जप्तीची पूर्वसुचना देऊन ज्या थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केला अशा मालमत्ता सर्वप्रथम सील करण्यात येऊन त्यांची लिलाव प्रक्रियेची नोटीस सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली. त्यामधील जवळपास ४३४ मालमत्ता अंतिम लिलावाच्या उंबरठ्यावर असून त्यांचा निश्चितपणे माहे एप्रिल व माहे मे २०२५ मध्ये लिलाव करण्यात येणार आहे. त्यासोबतच शहरातील थकबाकी असणाऱ्या रहिवाशी मालमत्तांचे नळ जोडणी खंडीत करुन त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची कारवाई व सदनिकाधारकांच्या शेअरसर्टिफिकेटवर थकीत रकमेचा बोजा चढविण्याची कारवाई करण्याच्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात आला. सोबतच, थकीत बिगरनिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र मालमत्तांच्या एकूण १०७२ मालमत्तांवर जप्तीची धडक कारवाई करण्यात आली. याबरोबरच रील्स स्पर्धा, टेलिकॉलिंग, एसएमएस यासारख्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्यासोबतच शहरामध्ये होर्डिंग, रिक्षाद्वारे, सार्वजनिक ठिकाणी अनांऊसमेंट, पाम्प्लेट व समाजमाध्यमांद्वारे जनजागृतीच्या माध्यमातून करसंकलन विभाग करदात्यांपर्यंत पोहोचल्याने चालूवर्षी ९६६ कोटींचा कर वसूल करण्यात यश आले आहे. करसंकलन विभागाने घेतलेल्या सर्व पुढाकारांमुळे मोठ्याप्रमाणात करवसूली करण्यास कर आकारणी व कर संकलन विभागाला सातत्य राखता आले आहे. असे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी स्पष्ट केले.
मालमत्ताकर भरणाऱ्या मालमत्तांची मालमत्ताप्रकारानुसार आकडेवारी..!
(मालमत्ता संख्या रक्कम कोटींमध्ये)
निवासी (Residential) – 579
बिगरनिवासी (Non-Residential) – 227.39
औद्योगिक (Industrial) – 54
मिश्र (Mixed) – 71.79
मोकळ्या जमीन (Empty Plots) – 33.41
इतर (Others) – 0.11
Total – 965.7
नागरिकांची ‘ऑनलाइन’ स्वरुपात कर भरण्यास पसंती !
भरणा प्रकार – रक्कम कोटींमध्ये
ऑनलाईन(Online) – 577.70
धनादेशाद्वारे (Cheque) – 142.84
रोख (Cash) – 108.98
अवैध शास्ती समायोजन (IllegalSamayojan) – 35.95
आरटीजीएस (RTGS) – 44.92
बीबीपीएस (BBPS) – 22.47
एनईएफटी (NEFT) – 19.58
डीडी (DD) – 6.69
इडीसी (EDC) – 3.35
समायोजन – 2.56
IMPS – 0.66
एकूण – 965.70
करसंकलनाच्या ठळक बाबी…
४० टक्क्यांची थकबाकी वसुली
चालू करामध्ये ८६ टक्क्यांची वसुली
तब्बल १०७२ इतक्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई
जवळपास ३ लाखाहून अधिक मालमत्ताधारक मालमत्ताकर भरण्यामध्ये झाले नियमित
पहिल्यांदाच मालमत्ताधारकांच्या सातबारा व सदनिकाधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर थकीत कराचा बोजा
थकीत रहिवाशी मालमत्ताधारकाची यादी प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष/सचिवाला दिली.
विविध मोहिमांद्वारे मालमत्ताकर भरण्यास करदात्यांना आवाहन…
महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने नेहमीप्रमाणे मालमत्ताकर वसूलीसाठी विविध सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून मालमत्ताकर भऱण्यासाठी आवाहन करण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये करसंकलन विभागाने ‘मी जागरुक करदाता’ रील-गाणे-रॅप बनवा या स्पर्धेतून नागरिकांनी कर भऱण्याचे सर्जनशील स्वरुपात आवाहन केले. चालू ट्रेंड व समाजमाध्यमांचा योग्य वापर केल्याने करसंकलन विभागाने समाजमाध्यमाचाही प्रभावीपणे वापर केला आहे. यामध्ये रीलस्पर्धेमधील व्हिडिओ तब्बल पाच लाखाहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. समाजमाध्यमासोबतच करसंकलन विभागाने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरामध्ये ज्या भागामध्ये थकबाकीदार आहेत अशा ठिकाणांचा अभ्यास करुन याठिकाणी होर्डिंग, रिक्षा, बोर्ड अभियान करण्यात आले. यामधून नागरिकांपर्यंत पोहोचण्यामध्ये करसंकलन विभागाला यश आले आहे. याबरोबरच करदात्यांना सवलतीबाबत, विलंब दंड व महानगरपालिकेच्या अभियानाबाबत ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आले. त्यासोबतच मालमत्ताकराचा भऱणा करण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकास ‘टेलिकॉलिंग’च्या माध्यमातून कर भऱण्याचे आवाहन करण्यात आले.
वाकडमधून झाली सर्वाधिक वसुली !
वाकड – 112.54
चिखली – 109.40
थेरगाव – 91.26
भोसरी – 68.66
सांगवी – 62.87
यावर आगामी वर्षामध्ये देणार भर !
येत्या आर्थिकवर्षामध्ये करसंकलनामध्ये वृध्दी करण्यासाठी करसंकलन विभाग काही पुढाकार घेणार असून त्याद्वारे करवसूली मोहिम राबविण्यात येणार असल्याचे करसंकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे,
थकबाकीदारांची संख्या शून्यावर आणण्यासाठी ‘थकबाकीदारमुक्त महानगरपालिका’ अभियान राबविण्यात येणार.
पहिल्या तिमाहीपासूनच बिगरनिवासी,व्यावसायिक,औद्योगिक मालमत्तांवर जप्तीची धडक कारवाई सुरु होणार.
रहिवाशी मालमत्ताधारकांची नळजोडणी खंडीत करणार.
सोसायट्यांमधील फ्लॅटचे पार्किंग क्रमांक सोसायट्यांकडून मागविण्यात येणार.
सर्वप्रथम रहिवाशी थकबाकीदारांच्या जंगम मालमत्तांवर चारचाकी वाहने/दुचाकी वाहने जप्तीची कारवाई करण्यात येणार.
मालमत्ताकराच्या बिलांवरच थकबाकीदार असल्याचा उल्लेख असणार.
कर भरण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक सजग करदात्यांचे मन:पूर्वक आभार !
“सन २०२४-२५ या आर्थिकवर्षीमध्ये मालमत्ताधारकांना विविध माध्यमातून मालमत्ताकर भऱण्याचे आवाहन करण्यात आले. आर्थिक वर्षामध्ये तब्बल १०७२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. करवसूलीसाठी करसंकलन विभागाने विविध अभियाने राबविल्याने मालमत्ताधारकांमध्ये करभरण्यामध्ये जागरुकता निर्माण झाल्याने तब्बल ९६६ कोटींच्या कराचा भरणा करण्यात आला आहे. शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी जागरुकपणे आर्थिकवर्षामध्ये कराचा भरणा केला अशा सर्व मालमत्ताधारकांचे मी मनापासून आभार मानतो. यापूढेसुध्दा अशाच पध्दतीने सजगपणे मालमत्ताकराचा भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.”
– प्रदीप जाभंळे पाटील. अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका
येत्या वर्षात थकबाकीदारमुक्त महानगरपालिका करणार !
“ नवीन वर्षात नोंदणी न झालेल्या संपुर्ण मालमत्ताधारकांना अंतिम बिल देण्याची कार्यवाही पुर्ण करणे, जप्ती व लिलाव प्रक्रिया सतत सुरु ठेवणे. रहिवाशी मालमत्ताधारकाच्या जंगम मालमत्ता जप्त करणे तसेच त्यांचे शेअरसर्टिफिकेटवर नोंदी घेणे, तसेच रस्ता रुंदीकरणात, संपादनात, अतिक्रमणात नष्ट झालेल्या मिळकतींच्या नोंदी कमी करणे या पंचसुत्रीचा वापर करुन सन २०२५-२६ या आर्थिकवर्षात थकबाकीमुक्त महानगरपालिका करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी विविध माध्यमातून थकीत कर वसूल करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. चालूवर्षी मालमत्ताकर भरलेल्या सर्वच जागरुक मालमत्ताधारकांचे मी मनापासून आभार मानतो.”
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका