पुणे (Pclive7.com):- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य कबड्डी संघटनेवर काम करण्यासाठी भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा लांडगे यांना संधी दिली आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक बाबूराव चांदेरे यांचा पत्ता कट करून लांडगे यांना संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अजितदादांनी महेश लांडगे यांच्यासोबतचे संबंध कायम ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
प्रत्येक जिल्हा कबड्डी संघटनेतून तीन सदस्य राज्य संघटनेवर पाठवयाचे असतात. पुण्यातून अजित पवार यांचे नाव निश्चित होते. इतर दोन नावांसाठी प्रसिद्ध खेळाडू शांताराम जाधव आणि राष्ट्रवादीचे पुण्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांची चर्चा सुरू होती. यापैकी कोणाला संधी द्यायची यावर दोघांमध्ये अजितदादां समोरच वाद रंगला होता. त्यावर मी यावर निर्णय घेतो, असे सांगून त्यांनी त्यावेळी निर्णय पवार यांनी लांबणीवर ढकलला. नावे ठरविताना करताना त्यांनी महेश लांडगे आणि शकुंतला खटावकर यांना संधी दिली. लांडगे यांचे नावही सुरवातीच्या चर्चेत नव्हते. तरीही त्यांना संधी मिळाल्याने तो संघटनेतही वेगळा विषय ठरला.
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या आजीव सदस्यांमध्येही लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा कबड्डी संघटनेतही त्यांना पदाधिकारी म्हणून जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावरील कबड्डी संघटनांची घटना बदलून त्यानुसार नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे काम सुरू आहे. त्याल लांडगे यांना स्थान देऊन भोसरीतील नेत्यांवर लक्ष कायम असल्याचा संदेश अजितदादांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकारणात आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे अजितदादांचे कट्टर समर्थक समजले जात होते. दोघेही आता स्वयंभू नेते झाले आहेत. पिंपरीत भाजपची सत्ता आल्यानंतर हे दोघेच प्रामुख्याने तेथील सूत्रे हलवत आहेत. अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी पालिकेचा दौरा केला तेव्हा लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका केली होती. लांडगे यांना मात्र फार लक्ष्य केलेले नव्हते. दादांनी त्यांना कबड्डी संघटनेत स्थान देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. आता लांडगे दादांच्या राजकीय संघाशी म्हणजे राष्ट्रवादीशी ते जवळीक साधणार का, याची उत्सुकता आगामी काळात राहील.






















Join Our Whatsapp Group