भोसरी (Pclive7.com):- चिखली येथील पवार वस्तीमधील दोस्ती हॉटेलमध्ये (दि.१७) रोजी रात्री ९.१५ वाजता दोन अज्ञात आरोपींनी धुडगूस घालत हॉटेल कर्मचारी व त्याच्या भावावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चिखली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कन्हैया अशोक रस्तोगी (वय १९ वर्षे, रा. पवार वस्ती, चिखली, पुणे; मूळगाव – फर्वहा, ता. कप्तानगंज, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. ते आणि त्यांचा भाऊ अर्जुन अशोक रस्तोगी हॉटेलमध्ये काम करीत असताना, आरोपी वृषभ मानके व घनश्याम यादव (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) हे दोस्ती हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक बालाजी पांचाळ कोठे आहे असे विचारले.

बालाजी पांचाळ तेथे नसल्याचे समजल्यावर, काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून आरोपींनी पाण्याचे जार फेकून दिले व शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधील टेबल फोडून, आरोपींनी कन्हैया रस्तोगी यांना बेल्टने छातीवर व बांबूने डाव्या पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच अर्जुन रस्तोगी याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघांनी हॉटेलमधील खुर्च्या, टेबलांची तोडफोड करून पळ काढला.
या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत.























Join Our Whatsapp Group