निगडी (Pclive7.com):- प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचा ३४ वा वर्धापन दिन सेक्टर क्रमांक २५ मधील तारांगण सभागृहामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संघाच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ ज्योती इंगोले व मंगेश वर्टीकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राधिका बोरलीकर यांना आदर्श समाजसेविका तर लता शिंगरू यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी महापौर आर एस कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे तसेच भारती फरांदे, उद्योजक अतुल इनामदार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंदराव मुळूक, दिलीप गोसावी, अध्यक्ष भगवान महाजन उपस्थित होते.
पुरस्कारार्थीच्या वतीने ज्योती इंगोले व मंगेश वर्टिकर यांनी मनोगत व्यक्त केले. एकपात्री कलाकार मारुती करंडे यांनी हसता खेळता माणूस बनवूया हा कार्यक्रम सादर केला. उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवान महाजन यांनी प्रास्ताविक केले. अर्चना वरटिकर यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गोसावी यांनी आभार मानले. संघाच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





















Join Our Whatsapp Group