पिंपरी (Pclive7.com):- चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी (दि.२७) करण्यात आली.
पार्थ किरण काकडे (२३, रा. कुडचे मळा, इचलकरंजी, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी, कोल्हापूर) आणि त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळेगाव येथील महिलेला फोन करून तुमच्या पतीचा खून झाला तसाच तुमच्या मुलालाही त्रास देईन, अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरण गंभीर असल्याने उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, खंडणी विरोधी पथकाने मोबाईल आणि सिमच्या तांत्रिक विश्लेषणावर आधारित तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य आरोपी पार्थ किरण काकडे यास कामगार वसाहत, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. त्याने त्याचा मित्र ऋषिकेश ऊर्फ सोनू वराळे (रा. कामगार चाळ, इचलकरंजी) आणि आणखी तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने खंडणीसाठी कॉल केला होता, असे कबूल केले आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपीला तपासासाठी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे, सहायक निरीक्षक सुमिल कानगुडे, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, प्रदीप गोंडाबे, किरण जाधव, किरण काटकर, किशोर कांबळे यांच्या पथकाने केली आहे.